पाचोरा, (प्रतिनिधी) : सिन्नर येथील देवदर्शन आटोपून गावी परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो पिकअप वाहनाला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याची भीषण दुर्घटना भडगाव ते पाचोरा दरम्यान घडली. ११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११:३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या दुर्घटनेत बोलेरो पिकअपमधील एकूण १२ भाविक जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील बंजारा समाजातील भाविक सिन्नर तालुक्यातील वडांगडी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना पाचोरा-भडगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय पवार (५०), अविनाश पवार (२४), सुनील राठोड (२७), सुपडुबाई ईश्वर पवार (४०), उज्ज्वलाबाई सुनील राठोड (२२) आणि मिराबाई सरिचंद राठोड (६०) हे सहा जण गंभीर जखमी झाले असून, इतर सहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने भडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, जिथे डॉ. पंकज जाधव यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सर्व जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून, अपघात नेमका कसा घडला यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.








