जळगाव, (प्रतिनिधी) : वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ‘एक पेड़ पापा के नाम’ हा अभिनव वृक्षारोपण उपक्रम रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगाव आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत रोटरी क्लबच्या सदस्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुमारे १५ फूट उंचीची ५० झाडे लावली. या वृक्षांचे पुढील दोन वर्षे संगोपन, पाणीपुरवठा व संरक्षणाची जबाबदारी रोटरॅक्ट गोदावरीच्या सदस्यांनी स्वीकारली. केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, रोटरी क्लबचे चेअरमन संजय तापडिया, डॉ. केतकी पाटील, धर्मेंद्र भैय्या, रमेश मुंगड, राजीव बियाणी, डॉ. गोविंद मंत्री, निलेश झंवर, डॉ. मुर्तझा अमरेलीवाला, दिनेश तिवारी व नितेश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आला. वाढदिवसाचा आनंद समाज आणि पर्यावरणासाठी उपयुक्त उपक्रमातून साजरा करण्याचा आदर्श यानिमित्ताने निर्माण झाला. या वेळी गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निलीमा वारके, गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. निलीमा चौधरी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरॅक्ट अध्यक्षा भूमिका नाले यांनी केले.








