जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शाळा आणि कॉलेज परिसरात वाढत्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष धडक मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान अल्पवयीन वाहनचालकांसह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर वाहनधारकांवर विविध कलमान्वये कडक कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेत विनापरवाना वाहने चालवणाऱ्या तब्बल २४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पालकांना ठाण्यात बोलवून घेत बालकांच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने समज दिली आणि त्यांचे समुपदेशन केले. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ११९ वाहनधारकांना ई-चालान देण्यात आले असून, त्यांच्यावर तब्बल १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यापैकी ८२ हजार रुपयांचा दंड ऑन द स्पॉट वसूल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई प्रोबेशनरी डीवायएसपी (Dysp) सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे शाळा-कॉलेज परिसरातील बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.










