अमळनेर, (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या वाढदिवसाच्या संकल्पातून भोकर येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या तथा अमळनेरच्या नगरसेविका जयश्री अनिल पाटील उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ उत्सव न साजरा करता, सामाजिक बांधिलकी जपत मोनालिका पवार यांनी वृक्षारोपणाचा स्तुत्य संकल्प केला. या उपक्रमाचे गावातील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण भागात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थितांनी केले.
या सोहळ्याप्रसंगी भोकर गावातील प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र डिंगबर पवार, प्रा. भाऊसाहेब सोनवणे, अशोक पाटील, श्रीराम पाटील, डॉ. अमोल भालेराव आणि किशोर पवार प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुकदेव पाटील, दीपाली राजपूत, प्रभाकर सोनवणे, सुकदेव बाविस्कर, लोटण सोनवणे, योगेश कोळी, विलास सोनवणे, धनराज वारडे, सुरेश जगन्नाथ पवार, बाविस्कर सिस्टर, आशा सेविका भाग्येश्री सोनवणे यांच्यासह शाळेतील शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.







