जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, रविवारी (दि. २१) शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे भव्य वह्या व दप्तर वाटप सोहळा उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या १,००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
बॅनरबाजीला फाटा, समाजउपयोगी उपक्रमाला प्राधान्य..
आमदार राजूमामा यांनी यंदा आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची जाहिरात, होर्डिंग किंवा बॅनरबाजी न करता, समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ‘वह्यादान’ करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १,००० वह्यांचे संकलन केले.
या साहित्याचे वाटप भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे आणि विविध नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन मिलिंद गोविंद चौधरी व उदय भालेराव यांनी केले होते.
नवीन शैक्षणिक वर्ष आणि शाळा सुरू झाल्या-झाल्याच हक्काचे दप्तर आणि वह्या मिळाल्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाला जळगाव शहरातील असंख्य विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमदार राजूमामा यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी यांसह विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.







