जळगाव दि.8 – भारतीय संगीताच्या अभिजात अंगापैकी महत्त्वाचे असलेले धृपद अंतर नादाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. देव देवतांची अनुभूती विनोदकुमार व्दिवेदी, आयुष व्दिवेदी यांचे धृपद गायन उध्दवराव आपेगावकर यांची पखावजावर उपज अंगाने साथ दिली हे आजच्या प्रथम सत्राचे आकर्षण होते. आजच्या कार्यक्रमाच्या सुरूवातीला राग केदार मधील आलाप जोड आणि झाला सादर केला. बोल होते ‘चंद्र बदन मृग नयनी ही’ त्यानंतर चौतालातील बंदिश सादर केली.
कार्यक्रमात पुढे सुल तालात निबध्द पंडित विनोदकुमार व्दिवेदी यांची स्वरचित बंदिश ‘जय जय हनुमान महाबली महान’ हि रचना सादर केली. त्यानंतर पं.विनोदजी व त्यांचे चिरंजीव आयुष यांनी राग देस मधील मत्त तालातील निबध्द अशा अनवट रचना सादर केली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष रचना ‘देवभुमी भारत शुभ वंदना’ ही रचना राष्ट्राला समर्पीत केली. ‘राजा रामचंद्र राघव सितापती पुरूषोत्तम्..’ भक्ती रचनेने रसिक भावनिक झाले.
या सत्राचा समारोप दृत सुल तालातील रचना ‘भारत पुण्यधन- ऋषीमुनी परंपरा’ या व्दिवेदी पिता-पुत्रांना पखावजवर आंबेजोगाईच्या पंडित उध्दवराव आपेगावकर यंनी दमदार साथ केली. तर तानपु-यावर प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते मयुर पाटील व विजय पाटील यांनी साथ संगत केली.
तबला पखावज जुगलबंदीची मोहिनी
प्रसिध्द तबला वादक पं. कुमार बोस यांनी मध्यलय तिनताल सादर केला यामध्ये पेशकार, बंदिशी तुकडे पलटे, रेले यांच्या माध्यमातून नादब्रम्हाची अनुभूती दिली त्यांच्या बरोबर शिष्य पखवाज वादक कुणाल पाटील यांनी तितकेच दमदार पखवा
जवादन करून रंगत भरली. मिलिंद कुलकर्णी यांनी नगम्याची साथ दिली.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे बालगंधर्व महोत्सवाला प्रायोजकत्व लाभले असुन आजच्या कार्यक्रमाप्रसंगी जैन इरिगेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॕ. सुधीर भोंगळे, जैन इरिगेशनचे अनिल जोशी, भारतीय जीवन विमा कंपनीचे अरूण जोशी, उद्योजक किरण बेंडाळे, अशोक बागडे, प्रा. शरदचंद्र छापेकर, केशवस्मृतीचे रत्नाकर पाटील यांच्यासह कलावंताची उपस्थिती होती. मैफिलचे सादरीकरण करणाऱ्या कलावंताचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गणेशवंदना मयुर पाटील यांनी सादर केली.
रविवारी शास्त्रीय उप-शास्त्रीय गायनासह कोकण कन्या बॅंड
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर,तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या सांगतेला मुंबईच्या स्मिती मिश्रा शास्त्रीय उप- शास्त्रीय गायनासह सादर करतील. यंदाच्या बालगंधर्व महोत्सवाचे आकर्षण असलेल्या मुंबई येथील कोकण कन्या बॅंड संगितकार रविराज कोलथरकर, आरती सत्यपाल, अरूंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, साक्षी मराठे व विशाल सुतार सादर करणार आहेत.
चतुर्थ दिन प्रथम सत्र – स्निती मिश्रा (भुवनेश्वर) शास्त्रीय गायन – शास्त्रीय संगीताची सेवा करणारी व उच्च विद्याविभूषित असलेली स्निती मिश्रा सन २०१० साली झालेल्या झी सा रे ग म प सिंगिंग सुपरस्टार या रियालिटी शोमधून प्रकाश झोतात आली. भारतीय अभिजात संगीताबरोबरच सूफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते इ. प्रकार स्निती लीलया सादर करते. वाल्हे घराण्याचे डॉक्टर दामोदर होटा यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित श्री रघुनाथ साहू त्यांच्याकडे तिचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले. इंडो स्विडिश फ्युजन बँड “म्यानता” शी ती संलग्न आहे. शिवामणी व ग्रॅमी अवॉर्ड नॉमिनेटेड संगीतकार लुईस बँक यांच्यासोबत स्मृतीने अनेक कार्यक्रम केले आहेत. स्निती भारतासह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीय अभिजात संगीताच्या फ्युजन कॉन्सर्ट करीत असते. तामिळ चित्रपट “महावीरन किट्टू” या चित्रपटासाठी संगीतकार डि. इमान यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पार्श्वगायन केले होते. ए. आर. म्युझिक स्टुडिओ बरोबर केलेल्या संयुक्त उपक्रमात काश्मिरी सूफी गायन करून ते जगभरात प्रसिद्ध झालं. तिच्यासोबत यशवंत वैषणची तबला साथ व मिलिंद कुलकर्णी यांची संवादिनी साथ स्नितीला लाभणार आहे.
चतुर्थ दिन द्वितीय सत्र – कोकण कन्या बँड (मुंबई) – कलर्स हिंदी या टीव्ही चॅनेलच्या रायझिंग स्टार्स या रियालिटी शोमधून घराघरात पोहोचलेल्या कोकण कन्या बँड यांनी त्यावेळी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले होते. या बँड चे संगीतकार रविराज कोलथरकर यांच्या संगीत दिग्दर्शनात तयार झालेली गाणी परीक्षकांच्या व रसिक श्रोत्यांच्या मनावर अक्षरश: बिंबली. या शोचे परीक्षक गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी या बँड सर प्रचंड कौतुक केलं होतं आणि हिंदी चित्रपट गीतांना कशाही प्रकारे संगीत देऊन वेगळ्या पद्धतीची गाणी तयार होऊ शकतात असं नमूद केलं होतं कोकण कन्या बँड मध्ये फक्त आठ कलावंत असून यामध्ये सहा मुली म्हणजे आरती सत्यपाल, अरुंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, व साक्षी मराठे त्याचप्रमाणे संगीतकार रविराज कोलथरकर व पर्कशनिस्ट विशाल सुतार यांचा समावेश आहे.