जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असतानाच, एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत एका संशयित चोरट्याला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुण सखाराम अहिरे (वय ३८, रा. तांबापुरा) यांनी आपली हिरो होंडा स्लेंडर गाडी (क्र. MH 28 G 3256) घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. ३ एप्रिलच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास लावलेली ही गाडी ४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनके त्यांच्या पथकातील नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, अवघ्या १२ तासांच्या आत संशयित आरोपी साहिल महंमद तडवी (वय २८, रा. मच्छी बाजार, तांबापुरा) याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने गाडी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीला गेलेली दुचाकी जप्त केली असून पुढील तपास पोलीस नाईक मनोज घुले करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.








