जळगाव, (प्रतिनिधी) : गिरणा नदीवरील प्रस्तावित सात बंधाऱ्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळूनही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्षा कल्पिता रमेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, हे काम त्वरित सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, गिरणा धरणाखालील १६८ किलोमीटरच्या परिसरात ५० ते ६० गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सात साखळी बंधारे बांधण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीची दखल घेत राज्यपालांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी या प्रकल्पाला नवीन प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. त्यानंतर २८ डिसेंबर २०१८ रोजी ७११.१५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यताही मिळाली होती.
या प्रकल्पासाठी लागणारी पाणी उपलब्धता प्रमाणपत्रे (०.९० टीएमसी) जलविज्ञान प्रकल्प, नाशिक यांच्याकडून २०१३ मध्येच प्राप्त झाली आहेत, तसेच केंद्रीय जल आयोगाचीही मान्यता मिळाली आहे. मेहुणबारे, बहाळ (ता. चाळीसगाव), पांढरद, भडगाव (ता. भडगाव), परधाडे, कुरंगी (ता. पाचोरा) आणि कानळदा (ता. जळगाव) या ठिकाणी हे बंधारे प्रस्तावित आहेत.
सर्व तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण असतानाही गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडले आहे. यामुळे गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कल्पिता पाटील यांनी दिला आहे. यावेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवांजरी, वाय. एस. महाजन, सुनिल माळी, गौरव वाणी, प्रतिभा शिरसाठ आदींचा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.







