जळगाव, (प्रतिनिधी) : प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री यांच्याहस्ते जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत करण्यात आलेल्या सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवून हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. प्रशासनात ‘Ease of Living’ आणि ‘Ease of Working’ ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जिल्ह्याने ई-ऑफीसचा १००% वापर, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि GIS तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांसारख्या ७ प्रमुख निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केली.
या सोहळ्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जळगाव प्रशासनाने केलेल्या कामाचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी बोलताना त्यांनी “हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ असून, ते सर्व जळगावकरांना समर्पित आहे,” अशी भावना व्यक्त केली. या यशामुळे डिजिटल क्रांतीच्या दिशेने जळगाव जिल्ह्याचा गौरव राज्यस्तरावर उंचावला आहे.







