जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये राबविण्यात येत असलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान नशिराबाद पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी दोन गावठी कट्ट्यांसह रंगेहात अटक केली आहे.
दिनांक २३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी चेतन सूर्यभान पाटील (वय १८, रा. वरची अळी, नशिराबाद) हा गावठी कट्टा घेऊन बस स्थानक परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीची शहानिशा करून सपोनि नारखेडे यांनी तात्काळ शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी रात्री ८:२० वाजेच्या सुमारास संशयित आरोपीवर अचानक छापा टाकला आणि त्यास जागीच ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक लोखंडी चंदेरी रंगाचा, काळ्या प्लास्टिक मुठीचा गावठी कट्टा आणि एक डमी गावठी कट्टा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ विभाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, सफौ राजेश मेंढे, पोहेकॉ कमलाकर बागुल, पोकॉ भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, भूषण पाटील आणि विजय अहिरे यांच्या पथकाने केली आहे.








