जळगाव, (प्रतिनिधी) : शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी कठीण प्रसंगातही जिद्द सोडू नये, या उद्देशाने जळगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘गुरुजी’ हा शैक्षणिक चित्रपट दाखविण्यात आला. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा संघर्ष आणि शिक्षणाची ओढ यावर आधारित या चित्रपटाने विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक छाप पाडली.
शिक्षण विभागाच्या विशेष सूचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रपटात दुर्गम भागातील विद्यार्थी कोणत्या प्रकारे संकटांशी दोन हात करून आपले शिक्षण पूर्ण करतात, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. हा प्रेरणादायी प्रवास पाहून अनेक विद्यार्थी भावूक झाले, तर काहींनी यातून धडा घेत अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक दिप्तेश सुलक्षणे उपस्थित होते. ”केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसते, तर अशा चित्रपट आणि उपक्रमांतून मिळणारी प्रेरणा विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलू शकते. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणाची वाट सोडू नका,” असे आवाहन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी यावेळी केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात चित्रपटाचा आनंद लुटला. चित्रपटातील संदेश केवळ पडद्यापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या दैनंदिन जीवनात अमलात आणण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते, ज्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.







