जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ अशी गर्जना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात त्यांना अभिवादन करण्यात आले. नगर पथ विक्रेता समिती सदस्य आणि हॉकर्स बांधवांच्या वतीने नेताजींच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नेताजींच्या प्रतिमेला व स्मारकास माल्यार्पण केले. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी दिलेला लढा आणि त्यांचे जाज्वल्य राष्ट्रप्रेम आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य मोहन तिवारी, दिनेश हिंडणे, नंदु महाजन, शुभम जाधव, विशाल पाटील यांच्यासह शहरातील बहुसंख्य हॉकर्स बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शिस्तबद्धरीतीने एकत्र येत नेताजींच्या कार्याचा जयघोष केला.








