जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आव्हाणे गावात गुरुवारी रात्री एका क्षुल्लक वादाचे पर्यावसान भीषण हत्येत झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. किरकोळ बाचाबाचीनंतर झालेल्या धक्काबुक्कीत गंभीर दुखापत झाल्याने सागर अरुण बिऱ्हाडे (वय ३२) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील जुन्या मारुती मंदिर परिसरात गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सागर बिऱ्हाडे आणि एका संशयित व्यक्तीमध्ये कोणत्यातरी कारणावरून शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने सागरला जोराने ढकलून दिले. या धक्क्यामुळे सागर जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली..
सागरला ग्रामस्थांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
मृत सागर बिऱ्हाडे हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. ऐन तरुण वयात सागरचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले असून संपूर्ण आव्हाणे गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू..
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्या पोलीस फरार आरोपीच्या मागावर असून, किरकोळ वादाचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.








