जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण परिसरातील साईबाबा मंदिराचा १९ वा वर्धापन दिन यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने दि.२३ ते २५ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘दरबार मेरे साई का’ या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भक्तीचा त्रिवेणी संगम: साईकथा आणि महाप्रसाद..
वर्धापन दिन उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बीड येथील सुप्रसिद्ध साई कथाकार साई गोपाल देशमुख यांचे प्रवचन असणार आहे. त्यांच्या रसाळ वाणीतून साईबाबांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या शिकवणीचा अनुभव भाविकांना घेता येईल.
कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
दि. २३, २४ व २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७:३० ते रात्री १०:३० या वेळेत विशेष भक्ती सेवा पार पडतील. रविवारी, २५ जानेवारी रोजी दुपारी ११:०० ते ३:०० या वेळेत महाप्रसाद व भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमासाठी माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. मेहरुण परिसरातील आणि जळगाव शहरातील सर्व साईभक्तांनी या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.







