जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलमध्ये पार पडलेल्या १७ वर्षांखालील मुलींच्या ‘सीआयएससीई नॅशनल स्कूल गेम्स’ अंतर्गत राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपल्या कौशल्याच्या जोरावर सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या चुरशीच्या स्पर्धेत पश्चिम बंगालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर ‘सीआयएससीई’चा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
महाराष्ट्राच्या कन्यांची सुवर्ण भरारी..
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी ट्रॅडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक पेअर अशा तीनही महत्त्वाच्या प्रकारांत सुवर्णपदकांवर नाव कोरले. ट्रॅडिशनल सिंगलमध्ये महाराष्ट्राच्या निरल वाडेकर हिने सुवर्ण यश मिळवले. तसेच रिदमिक पेअरमध्ये तृप्ती डोंगरे हिने सुवर्णपदक पटकावून राज्याचा गौरव वाढवला. आर्टिस्टिक सिंगल प्रकारात मात्र पश्चिम बंगालच्या आनया हुतीत हिने बाजी मारत सुवर्ण पटकावले, तर महाराष्ट्राच्या आर्य सापते हिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
योगामुळे शरीर आणि मन प्रसन्न: डॉ. जोसेफ इमॅनुअल..
पारितोषिक वितरण समारंभात सीआयएससीईचे सचिव डॉ. जोसेफ इमॅनुअल यांनी मार्गदर्शन केले. “शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ १५ मिनिटांचा नियमित सराव आपल्याला अनेक व्याधींपासून दूर ठेवू शकतो,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाला अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, प्राचार्य देबासीस दास यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रामाणिकपणाचे दर्शन: हरवलेले दागिने आणि मोबाईल परत..
स्पर्धेदरम्यान एक कौतुकास्पद घटना घडली. इंदूर येथील प्रोफेसर डॉ. निशा सिद्दिकी यांची दागिने आणि रोकड असलेली पर्स हरवली होती. जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या समीर शेख यांनी अवघ्या दोन तासांत ती शोधून परत केली. तसेच राजस्थान आणि पंजाबच्या खेळाडूंचे हरवलेले मोबाईलही अजित घारगे यांनी सुपूर्द केले. “जळगाव आणि अनुभूतीतून मी अत्यंत सकारात्मक आठवणी घेऊन जात आहे,” अशी भावना डॉ. सिद्दिकी यांनी यावेळी व्यक्त केली.







