जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी (१९ जानेवारी) दुपारी मोठी कारवाई केली. या छाप्यात देहविक्रय करणाऱ्या चार महिलांची सुटका करण्यात आली असून, यामध्ये पश्चिम बंगाल आणि सुरत येथील दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह दोन एजंटांना ताब्यात घेतले आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा सापळा..
संबंधित भागात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध कुंटणखाना सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) नितीन गणापुरे यांनी पथकासह कारवाईचे नियोजन केले.
डमी ग्राहक आणि धाडसी कारवाई..
पोलिसांनी या कुंटणखान्याचे पितळ उघड पाडण्यासाठी एक डमी ग्राहक तयार केला. त्या ग्राहकाला १५०० रुपये देऊन संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले. व्यवहाराची खात्री पटल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ‘मिस कॉल’ देऊन इशारा केला. इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी घरावर छापा टाकला.
या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे,
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह आवेश शेख, प्रणय पवार, अमोल ठाकूर, रतनहरी गीते, रवींद्र मोतीराया आणि महिला पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.
महिलांची सुटका, आरोपी ताब्यात..
छाप्यादरम्यान पोलिसांना तिथे चार महिला मिळून आल्या. यात एक महिला पश्चिम बंगालची, एक सुरतची तर दोन स्थानिक महिला होत्या. पोलिसांनी या सर्वांची सुटका केली आहे. कारवाई सुरू असताना तिथून एक ग्राहक पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी कुंटणखाना चालविणारी महिला आणि दोन मध्यस्थ (एजंट) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.







