जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील जनतेने आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर विश्वास ठेवून आम्हाला कौल दिला आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता, येणाऱ्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असे ठाम प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले.
शनिवारी (दि. १७) रोजी विष्णू भंगाळे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप आणि विविध वादांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
आरोपांना कामातून उत्तर देणार..
निवडणुकीच्या काळात माझ्यावर झालेल्या विविध आरोपांबाबत बोलताना भंगाळे म्हणाले की, “माझ्यावर झालेल्या आरोपांना मी प्रतिआरोपांनी उत्तर देणार नाही. जनतेने दिलेला कौल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. भविष्यात विकासाची कामे करूनच मी सर्व आरोपांना उत्तर देईन.”
गाडीवरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
निवडणुकीच्या रणधुमाळीत विष्णू भंगाळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली होती. या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, ही घटना दुर्दैवी असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आपले काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोगस मतदारांच्या संशयावरून तक्रार..
मतदानाच्या दिवशी घडलेल्या एका प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ बोगस मतदार असल्याचा संशय घेऊन एखाद्या मतदाराला मतदानापासून वंचित ठेवणे हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली असल्याचेही भंगाळे यांनी यावेळी नमूद केले.







