जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३ ‘ब’ मध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. या प्रभागातील अपक्ष उमेदवार प्रियंका विनोद तायडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुरेखा नितीन तायडे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या निर्णयामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, सुरेखा तायडे यांची बाजू अधिक भक्कम झाली आहे.
आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रियंका तायडे यांनी पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. सुरेखा तायडे यांचा प्रदीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव, नागरिकांच्या समस्या सोडवण्याची त्यांची तत्परता आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली त्यांची सकारात्मक दृष्टी पाहून हा निर्णय घेतल्याचे प्रियंका तायडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार..
यावेळी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, “भाजपच्या विकासकामांवर विश्वास ठेवून अपक्ष उमेदवारांनी दिलेला हा पाठिंबा विजयाचा मार्ग सुकर करणारा आहे.” या पाठिंब्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये भाजपच्या बाजूने सकारात्मक संदेश गेला आहे.
याप्रसंगी प्रभाग १३ ‘अ’ चे उमेदवार नितीन सपके, प्रफुल देवकर, विनोद तायडे, विशाल देवकर, अजित राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपक्ष उमेदवाराने माघार घेत पाठिंबा दिल्याने आता प्रभाग १३ ‘ब’ मध्ये भाजपचे पारडे जड मानले जात आहे.








