जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रक्ताळलेला थरार पाहायला मिळाला. जुन्या वादाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरुणाने १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार केले. दुर्दैवाने, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
साई गणेश बोराडे (वय १८, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. साई हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (२५, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते. बुधवारी सकाळी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. याचाच बदला घेण्याच्या हेतूने शुभमने हे टोकाचे पाऊल उचलले.
दुपारी २ वाजेच्या सुमारास साई बोराडे हा गोलाणी मार्केट परिसरात आला असताना, संशयित आरोपी शुभमने त्याला गाठले. काही कळण्याच्या आतच संतापलेल्या शुभमने जवळ असलेला चाकू काढून साईच्या शरीरावर वर्मी घाव घातले.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली..
जखमी साईला नागरिकांच्या मदतीने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र जखमा खोल असल्याने त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी यांनी पथकासह घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी आता ‘खुनाचा’ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.








