जळगाव, (प्रतिनिधी) : नव्या वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात करण्यासाठी आणि कला-संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी जळगावात ‘परिवर्तन मैत्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन व ‘परिवर्तन’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव दि. १ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत भाऊंच्या उद्यानातील एमफी थिएटरमध्ये रंगणार आहे.
स्वर्गीय भवरलाल जैन आणि स्वर्गीय ना. धो. महानोर यांच्याशी असलेले ‘परिवर्तन’चे जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे नाते अधोरेखित करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून नृत्य, नाट्य, संगीत आणि चित्रकला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महोत्सवाचे उद्घाटन १ जानेवारीला होईल. त्यानंतर सलग आठ दिवस दररोज सायंकाळी ६:३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. यामध्ये जळगावच्या स्थानिक कलावंतांसह पुणे, कोकण, भुसावळ आणि शिरपूर येथील नामवंत कलावंतांचे नाट्य अविष्कार आणि सादरीकरण हे मुख्य आकर्षण असणार आहे.
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रेखा महाजन, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, इंजि. प्रकाश पाटील, नंदू अडवाणी, स्वरूप लुंकड, विनोद पाटील, पारस राका आणि मानसी गगडाणी हे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच ‘परिवर्तन’चे अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, अमर कुकरेजा, छबिराज राणे आणि नारायण बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या उपक्रमाला जैन उद्योग समूह आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.
महोत्सवाच्या तयारीसाठी मंजुषा भिडे, पुरुषोत्तम चौधरी, राजू बाविस्कर, हर्षल पाटील, होरीलसिंह राजपूत यांच्यासह परिवर्तनची संपूर्ण टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे. जळगावकर रसिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा मोठ्या संख्येने आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.








