जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज, मंगळवार (दि. २३) पासून प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून, या प्रक्रियेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नगरपालिकांच्या निकालानंतर आता महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्रे वाटप करणे आणि ती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. इच्छुकांना आपले अर्ज भरण्यासाठी अवघे आठ दिवस मिळणार असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव आणि शक्तिप्रदर्शनासाठी उमेदवारांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.
निवडणुकीचा असा असेल पुढील टप्पा:
इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत सादर करता येतील. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी असून, त्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनपेक्षित निकाल पाहायला मिळाल्याने, आता महापालिकेत कोण बाजी मारणार, याबाबत संपूर्ण जिल्ह्यात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने जळगाव शहरात खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीला वेग येणार आहे.








