जळगाव, (प्रतिनिधी) : लिंबूवर्गीय फळझाडांची लागवड करताना केवळ सुरुवातीच्या वाढीकडे न पाहता, भविष्यातील कीड-रोगांचा धोका टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या रोगमुक्त रोपांनाच प्राधान्य द्यावे, असा सूर जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) मध्ये उमटला. परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी यावेळी शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.
“सिट्रस पिकांवरील कीड व रोगांचे निदान, निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी नवोन्मेषी रणनीती.” हे सत्र परिश्रम सभागृहात झाले. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. एन. के. कृष्णकुमार यांनी भूषविले, तर सहअध्यक्ष म्हणून डॉ. एम. कृष्णा रेड्डी, डॉ. संदीप सिंग होते. सत्राचे समन्वयक म्हणून डॉ. वाय. व्ही. इंगळे, डॉ. आशिष वारघणे यांनी काम पाहिले.
या परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले:
मातृवृक्षाचे महत्त्व: इस्राईलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका यांनी सांगितले की, बंदिस्त गृहातील (Greenhouse) मातृवृक्षापासून तयार झालेली आणि मातीविरहित माध्यमातील रोपेच भविष्यात दर्जेदार उत्पादन देऊ शकतात.
आधुनिक तंत्रज्ञान: ड्रोन इमेजिंग, AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि सेन्सर सिस्टीमचा वापर करून बागेतील पाणी व्यवस्थापन व रोगांचे अचूक निदान करण्यावर डॉ. विशाल काळबांडे व इतर संशोधकांनी भर दिला.
संकट व उपाय: जगभरात लिंबूवर्गीय फळांसाठी घातक ठरणाऱ्या ‘HLB’ (ग्रीनिंग) रोगावर ब्राझीलच्या धर्तीवर उपाययोजना आणि जैविक कीटकनाशकांच्या वापराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
परिषदेची प्रमुख आकर्षणे:
विविधतेचे प्रदर्शन: परिषदेत देशभरातील लिंबूवर्गीय फळांच्या ४४ प्रजातींचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यात जैन इरिगेशनने विकसित केलेले ‘जैन मॅडरिन-१’ आणि ‘जैन स्वीट ऑरेंज-६’ हे वाण विशेष लक्षवेधी ठरले.
अभिनव संशोधन: मोसंबीच्या सालीपासून चटणी बनवणे, तसेच प्रक्रियेनंतर उरलेल्या कचऱ्यातून पोषक द्रव्ये मिळवणे अशा २० हून अधिक संशोधन पोस्टर्सचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे.
संशोधनानुसार, लिंबाची ‘साई शरबती’ ही जात कोळी कीडरोगाला सर्वात कमी बळी पडणारी असल्याचे समोर आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून जैन इरिगेशन आणि इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरने शेतकऱ्यांना आधुनिक फळबागेची नवी दिशा दिली आहे.








