जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांनी ऊब घेण्यासाठी शेकोट्या पेटवण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद १० डिसेंबर रोजी करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात रात्रीचा तापमानाचा पारा थेट ७.१ अंशांपर्यंत खाली घसरला होता, तर आता डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच तापमानाचा पारा ७ अंशांवर गेला आहे. गेल्या ६ वर्षांतील डिसेंबर महिन्यातील हा सर्वात कमी तापमानाचा रेकॉर्ड आहे.

जळगाव आणि नाशिक येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, दोन्ही शहरांचे तापमान ७ अंशांवर इतके होते. याआधी २०१९ मध्ये डिसेंबर महिन्यात पारा ६.४ अंशावर गेला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो ७.४ अंशांपर्यंत खाली आला होता. उत्तरेकडील वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय असून हवामान पूर्णपणे कोरडे असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आगामी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. पारा ८ अंशांच्या खालीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर तापमानात थोडाफार चढ-उतार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.








