जळगाव, (प्रतिनिधी) : समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या उदात्त भावनेतून जळगाव शहरातील दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी त्यांचे वडील कै. देवपुरी रामपुरी (डी.आर. नाना) गोसावी यांच्या प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम पारंपारिक रूढी बाजूला ठेवून एका समाजपयोगी उत्सवात रूपांतरित केला. मुकुंद गोसावी आणि त्यांच्या पत्नी मुक्ता गोसावी यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला, मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान, आणि अवयवदान, देहदान जनजागृती असे विविध उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले.

मुकुंद गोसावी यांनी वडिलांच्या निधनानंतरही (डिसेंबर २०२४) पहिल्या ते तेराव्या दिवसांपर्यंत दुखवटा न पाळता रामद्वारा सत्संग, वृक्षारोपण, रक्तदान, अवयवदान/देहदान, मतदान जागृतीसारखी सामाजिक कार्ये केली होती. तेराव्या दिवशी फक्त एक एक वृक्ष लावून रक्तदानाचे आवाहन केले होते, ज्याला नातेवाईक आणि परिचितांनी स्वेच्छेने प्रतिसाद दिला होता.
प्रथम वर्षश्राद्धात आरोग्य शिबिर व रक्तदान..
वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त ९ डिसेंबर, तसेच संघ शताब्दी वर्ष आणि ‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने श्रीराम नगर (दादावाडी परिसर) येथे विश्व शांती प्रार्थना, वृक्षारोपण आणि विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या रक्तपुरवठा कमी झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले.
या शिबिरात मुक्ता आणि मुकुंद गोसावी यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान करत उपक्रमाची सुरुवात केली. एकूण ४१ जणांनी रक्तदान करून सहयोग दिला. तसेच मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन शिबिराचा २६९ जणांनी लाभ घेतला. यामध्ये हृदय रोग, रक्तदाब, मधुमेह, जनरल तपासणी आदी करण्यात आल्या.
या शिबिरासाठी दशनाम गोसावी समाजातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शि.रा.गोसावी, विजया गोसावी, कैलासपूरी गोसावी, अनिलकुमार गोसावी, संध्या गोसावी, किशोरपूरी गोसावी, शाम गोसावी, अक्षय गोसावी, भाग्यश्री गोसावी, अर्चना रवींद्र गिरी, योगेश गोसावी, किरण गोसावी, आशीष गोसावी, सागर गोसावी, डॉ. अजय देशमुख, गोपाल वालेचा, स्वप्नील पालवे, गोपाल चौधरी, सतीश महाजन, हर्षद भारती, परिमल गिरी, अनिल गिरी आदींनी मोलाचे सहकार्य केले.








