जळगाव, (प्रतिनिधी) : जैन स्पोर्टस् अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू आणि के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हिची ५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, जयपूर (राजस्थान) येथे बास्केटबॉल खेळाची पंच (Referee) म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवाची शिदोरी..
सोनल हटकर हिने यापूर्वीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तिने गोवा व गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स/युनिव्हर्सिटी गेम्स तसेच फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, मेल (मालदीव) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साबा वुमन्स डेव्हलपमेंट कॅम्पसाठी तिची भारतातून निवड झालेल्या चार महिला पंचांमध्ये नियुक्ती झाली होती.
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव..
सोनलच्या या महत्त्वपूर्ण नियुक्तीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राणे, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. पी. देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ. दिनेश पाटील, जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, डाॅ. श्रीकृष्ण बेलोरकर, डाॅ. रणजीत पाटील, प्रा. यशवंत देसले, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. प्रणव बेलोरकर, प्रा. सुभाष वानखेडे, अमर हटकर यांच्यासह जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकाऱ्यांनी सोनलचे अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








