जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव येथील गंभीर समस्या आणि अनियमिततेमुळे जिल्ह्यातील हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ‘अभाविप’तर्फे महानगर मंत्री चिन्मय महाजन यांनी जळगाव आगार व्यवस्थापकांना निवेदन देत या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जळगाव शहर हे जिल्हाभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर असलेल्या ‘लालपरी’ बससेवेचा दररोज प्रवास करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रवासात अनेक अडथळे येत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

वेळापत्रकानुसार बसेस उपलब्ध नसून सर्व ग्रामीण थांब्यांवर बसेस वेळेवर उपलब्ध करण्याची मागणी केली आहे, बस वाहक विद्यार्थ्यांशी गैरवागणूक करतात अशा वाहकांवर दंडात्मक कारवाई करावी, पासधारक विद्यार्थ्यांना पासच्या नूतनीकरणासाठी तत्काळ सेवा द्यावी अशा स्वरूपाच्या विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. अन्यथा तीव्र आणि व्यापक आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा ‘अभाविप’तर्फे दिला आहे.








