वाढदिवसानिमित्त पंकज पाटील यांचा सामाजिक उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक ७ येथे शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवारातर्फे मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात साधारण ५५ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक रक्तदात्याला त्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचे वाटप करण्यात आले. शिवनेरी ग्रुपचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी शिव कॉलनी येथील चांदणी चौकातील मैदानात घेण्यात आले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वाहन चालवताना सुरक्षेसाठी म्हणून रक्तदात्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
आ. राजूमामा भोळे यांनी उपक्रमाचे केले कौतुक..
या स्तुत्य उपक्रमाला आमदार राजूमामा भोळे यांनी भेट दिली आणि आयोजकांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचे कौतुक केले. शिबिरामध्ये महिला व मुलींनी देखील रक्तदानासाठी पुढाकार घेतला. आयोजक पंकज पाटील यांनी देखील आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून एक उत्कृष्ट आदर्श घालून दिला. शिबिरासाठी रेड प्लस रक्तपेढीचे भरत गायकवाड आणि अमोल शेलार यांचे सहकार्य लाभले. तसेच, शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.







