जळगाव, (जिमाका) : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. निवडणुकीच्या दिवशी सर्व पात्र मतदारांना भरपगारी सुट्टी देणे सर्व खासगी आस्थापना, दुकाने, औद्योगिक संस्था आणि व्यावसायिक प्रतिष्ठान यांना अनिवार्य आहे.
काही खाजगी संस्थांकडून कामगारांना सुट्टी किंवा मतदानासाठी आवश्यक सवलत दिली जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. मतदानापासून वंचित राहणे हे लोकशाहीसाठी गंभीर धोका निर्माण करते. त्यामुळे, सर्व नियोक्त्यांनी कामगारांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सुलभ वातावरण निर्माण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केले आहे.
तक्रारीसाठी नोडल अधिकारी नियुक्त..
शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी घुगे यांनी विशेष नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. नोडल अधिकारी डॉ. रा. दे. गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त, जळगाव. सहाय्यक नोडल अधिकारी जितेंद्र पवार, दुकाने निरीक्षक श्रेणी-२ (मो. ९८६०८९८४८४).
ज्या कामगारांना त्यांच्या नियोक्त्यांकडून भरपगारी सुट्टी किंवा मतदानासाठी आवश्यक सवलत नाकारली जाईल, त्यांनी त्वरित सहायक कामगार आयुक्त कार्यालय, पहिला मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव येथे किंवा सहाय्यक नोडल अधिकारी पवार यांच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आला आहे.








