जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आणि ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात तातडीने ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्याची मागणी राष्ट्रीय हिंदू संघटन, जळगाव यांनी आज, गुरुवारी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
सध्या महाराष्ट्रातील महिला व युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली महिलांना फसविणे, त्यांचे धर्मांतरण, शोषण आणि क्रूर हत्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण असून कुटुंबीयांनाही मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या निवेदनात नमूद केले आहे.
त्याच बरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायदे लागू करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे महिलांना फसवणुकीपासून संरक्षण मिळाले आहे, याकडे लक्ष वेधले. याच धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे रक्षण व्हावे, यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय हिंदू संघटन, जिल्हा जळगावतर्फे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विजयकुमार शर्मा यांच्यासह जळगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघ, उपाध्यक्ष नागराज महाजन, जिल्हा महिला अध्यक्ष मंगला बारी, महिला युवा अध्यक्ष रत्ना अत्तरदे, महिला उपाध्यक्ष भारती शिंपी, महामंत्री राजेश जी बंसल, महासचिव राजेंद्र बारी, जिल्हा युवा अध्यक्ष योगेश बाविस्कर आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.







