जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०२५-२६ च्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना (Inter-Caste Marriage Promotion Scheme) अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सामाजिक सलोखा आणि एकात्मता वाढवण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने एकूण २०४ जोडप्यांना प्रत्येकी रू. ५०,०००/- (पन्नास हजार रुपये) चे अनुदान प्रातिनिधिक स्वरुपात वाटप केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्याहस्ते हा अनुदान वाटप समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी आंतरजातीय विवाह करून सामाजिक समता प्रस्थापित करणाऱ्या या जोडप्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देऊन समाजातील जातीय भेदभावाची भावना कमी करणे आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील अनुदानातून या जोडप्यांना हा लाभ देण्यात आला आहे. या मदतीमुळे या जोडप्यांना आपले संसार सुरू करताना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी यावेळी बोलताना, “आंतरजातीय विवाह करणाऱ्या नागरिकांप्रति जिल्हा प्रशासन नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवील. हे केवळ अनुदान नसून, जातीय सलोख्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अन्य पदाधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी जोडपी उपस्थित होती.







