जळगाव, (प्रतिनिधी) : यंग इंडिया फिट इंडिया या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘सुपोषित जळगाव’ या विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे, कुपोषण निर्मूलन, तसेच नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी यासाठी या मोहिमेअंतर्गत प्रत्येक आठवड्यात विविध आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात.
या अनुषंगाने शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सामूहिक सूर्यनमस्कार हा उपक्रम भव्य प्रमाणात संपन्न झाला. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच स्वयंसेवी संस्था उत्साहपूर्वक सहभागी झाल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुपोषित जळगाव या मोहिमेंतर्गत दर शनिवारी विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांना मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. प्रत्येक आरोग्य केंद्रात आरोग्यविषयक मार्गदर्शन, पोषणाचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी, योग व व्यायामाचे फायदे याबाबत जनजागृतीही करण्यात आली.








