जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील कांचननगरात टोळीच्या वर्चस्वातून झालेल्या रक्तरंजित संघर्षात एका तरुणाचा बळी गेला आहे. अंतर्गत वाद आणि कथित कुंटणखान्याची टीप दिल्यावरून तणाव वाढला होता, ज्यात एका तडीपार गुंडाने गोळीबार केला होता. गोळीबारानंतर फरार झालेल्या दोन मुख्य संशयितांना, आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (वय २५) आणि करण पाटील (वय २५), यांना जळगाव पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
कांचननगरात झालेल्या एका पार्टीत वर्चस्वाच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. यावेळी तडीपार गुंड आकाश उर्फ डोया सपकाळे याने केलेल्या गोळीबारात आकाश उर्फ टपऱ्या बाविस्कर याच्या छातीत गोळी लागली, तर गणेश उर्फ काल्या सोनवणे जखमी झाला. तर उपचारादरम्यान आकाश बाविस्कर (टपऱ्या) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, डीमार्ट परिसरातून डोया सपकाळे आणि करण पाटील या दोघांनाही मध्यरात्री अटक करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.








