जळगाव (प्रतिनिधी) : येथील महानगरपालिकेच्या बहुचर्चित आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात आली. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात चिठ्ठीद्वारे ही आरक्षण सोडत जाहीर होताच, नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. सोडतीच्या अंतिम चित्रानंतर, अखेर कोणत्याही प्रस्थापिताला धक्का बसला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरक्षण सोडतीदरम्यान व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी, नगर सचिव मनोज शर्मा आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जसजशी आरक्षणाची चिठ्ठी निघत होती, तसतशी राजकीय कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची धडधड वाढत होती.
या आरक्षण सोडतीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे, १९ प्रभागांपैकी १८ प्रभागांमध्ये ‘ड’ हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे अनेक प्रस्थापित माजी नगरसेवकांचे फावणार असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सोडतीमुळे जळगाव मनपा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड वाढणार आहे. परिणामी, सर्वच राजकीय पक्षांमध्ये आता तिकिटांसाठीची रस्सीखेच शिगेला पोहोचणार आहे, तर दुसरीकडे बंडखोरीला उत येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.










