जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणांहून व बाजारातून गहाळ झालेले तब्बल ६२ महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत करण्यात सायबर पोलीस स्टेशन, जळगाव यांना मोठे यश मिळाले आहे. या हस्तगत केलेल्या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे रु. १२,५०,०००/- (बारा लाख पन्नास हजार) आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतिष गोराडे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांना गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथील पोहेकॉ किरण वानखेडे, पोहेकॉ हेमंत महाडीक, पोना सचिन सोनवणे, पोकॉ पंकज वराडे, पोकॉ गौरव पाटील, पोकॉ मिलींद जाधव, पोकॉ दिपक पाटील (जळगाव पो.स्टे.) अशा पथकाने ही मोहीम राबवली.
या विशेष मोहीमेत, जळगाव जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये घेण्यात आला. अथक प्रयत्नानंतर पथकाने एकूण ६२ मोबाईल फोन हस्तगत केले. हस्तगत केलेल्या सर्व मोबाईलचे आज एकत्रितरित्या पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मूळ मालकांना वाटप करण्यात आले.