जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग येथे एका आरोपीला २५ किलो गांजासह अटक केली आहे. जप्त गांजाची किंमत अंदाजे १ लाख ७० हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, सहस्त्रलिंग येथील एका शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करण्यात आली आहे.
या माहितीच्या आधारे पोउपनि सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या माहितीची खात्री करून संबंधित शेतावर छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी महेरबान रहेमान तडवी (वय-३२, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर) याच्या शेतात २५ किलो वजनाचा कँनाबीस (गांजा) लागवड केलेला आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोउपनिरी सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी तसेच रावेर पोलीस स्टेशनच्या पथकाच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि मनोज महाजन, रावेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.