मुंबई, (वृत्तसेवा) : कविवर्य ना. धों. महानोर यांनी कविता, साहित्य आणि चित्रपटगीतांसोबतच शेती आणि पाण्यासाठी मोलाचे कार्य केले, असे गौरवोद्गोगार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांनी काढले. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्यावतीने शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
अशोक जैन यांनी त्यांच्या वडिलांसोबत (भवरलाल जैन) कविवर्य महानोर यांची शेती आणि साहित्यावरील चर्चा म्हणजे मेजवानी असायची, अशी आठवण सांगितली. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सहभाग म्हणजे जणू दुग्धशर्करा योग जुळून येत असे. महानोर यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी सातत्याने काम केले, असे ते म्हणाले.
सहा विभागातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान..
या सोहळ्याला माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, उद्योजक अशोक जैन, खासदार सुप्रिया सुळे, ना. धों. महानोर यांच्या कन्या सरला महानोर-शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या सहा विभागातून साहित्य आणि शेती-पाणी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आले:
▪️गीतकार अविनाश पोईनकर (चंद्रपूर)
▪️मुक्त पत्रकार हिना कौसर खान (पुणे)
▪️कवी-गीतकार वैभव देशमुख (बुलढाणा)
▪️सुचिता खल्लाळ (नांदेड)
कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार खालील मान्यवरांना देण्यात आला:
▪️साधना उमेश वर्तक (पालघर)
▪️कुसुम सुनील राहसे (नंदुरबार)
पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे होते.
मान्यवरांच्या भावना..
मनोगत व्यक्त करताना अरुणभाई गुजराथी म्हणाले की, महानोर हे महाकवी होते आणि त्यांनी कवितेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला. त्यांची मैत्री निखळ आणि निरागस होती.
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे कार्यक्रम करण्याबद्दलच्या द्विधा मन:स्थितीचा उल्लेख केला. महानोर असते तर त्यांनी महाराष्ट्राची वेदना कशाप्रकारे शब्दबद्ध केली असती हे सांगणे कठीण आहे आणि नवकवींनी त्यांचा वारसा पुढे सुरू ठेवावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
महानोरांच्या कन्या सरला महानोर-शिंदे यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. दत्ता बाळसराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना ना. धों. महानोर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील ऋणानुबंधाची आठवण सांगितली.