जळगाव, दि. 19 – परिवर्तन संस्थेच्या ‘भाऊंना भावांजली’च्या पाचव्या वर्षीच्या महोत्सवाचा समारोप रविवारी “गज़ल रेगिस्तान से हिंदुस्थान तक” या कार्यक्रमाने झाला.
कार्यक्रमात अमर कुकरेजा परिवर्तनाच्या कार्याचा गौरव करतांना सांस्कृतिक क्षेत्रात परिवर्तन उत्तम काम करत असून जळगावचा सांस्कृतिक चेहरा बदलताना बघतोय. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे दर्जेदार कार्यक्रम परिवर्तन करत असते त्याचा मी साक्षीदार आहे असे मत खास सिंधी भाषेत व्यक्त केलं.
‘परिवर्तन जळगाव शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी चांगल्या कार्यक्रमांची निर्मिती करत असून या कार्यक्रमांद्वारे आपल्या शहराचं सांस्कृतिक वातावरण समृद्ध होतंय हे आजही सिद्ध झाले आहे असे मत नारायण बाविस्कर ह्यांनी खास मारवाडी भाषेत व्यक्त झालेत. तर लीना निंबाळकर ह्यांनी तावडीत भाषेत सर्वांचे आभार मानलेत.
चित्रकार राजू बाविस्कर, विकास मलारा आणि विजय जैन यांना कलाक्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अतुल जैन, उद्योजक साजिदभाई शेख, सुचेता पाटील, डॉ अमोल सेठ, प्राचार्य डॉ एल पी देशमुख, अनिल शहा, परिवर्तनचे कार्याध्यक्ष नारायण बाविस्कर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर परिवर्तन निर्मित ‘गजल रेगिस्तान से हिंदुस्तान तक’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यात गायिका श्रद्धा कुलकर्णी, अक्षय गजभिये, हर्षदा कोल्हटकर तर तबल्यावर साथ-संगत भूषण गुरव, बुद्धभूषण मोरे यांनी केली. या कार्यक्रमाचे निवेदन शंभू पाटील यांनी केले.
या कार्यक्रमात आदिम काळापासून उर्दू, हिंदी, मराठी गझलेचा इतिहास, प्रवास मांडण्यात आला. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, मालवून टाक दीप, दिले नादान तुझे हुवा क्या, सिमटी हुई ये घडीयॉं, फिर छेडे रात, ए दिल या गझल सादर झाल्या. यात गालिब, सुरेश भट, साहिर लुधियानवी यांच्या गझलांचा समावेश होता. कार्यक्रमाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर, संकल्पना दिलीप पांढरपट्टे यांची तर निर्मिती प्रमुख विनोद पाटील व मंगेश कुलकर्णी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा भिडे यांनी केलं तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता दप्तरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहूल निंबाळकर, अक्षय नेहे, प्रतिक्षा, ऊर्जा सपकाळे, सिद्धी सिशोदे, मिलिंद जंगम, वसंत गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.