जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील ३७४ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी थेट भरती होणार आहे.
१५ जुलै रोजी मेळावा..
हा ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ दि. १५ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालय, ख्वॉजामिया रोड, प्रगती शाळेच्या बाजूला, जळगाव येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शैक्षणिक पात्रता आणि नोकरीच्या संधी..
या मेळाव्यात १० वी, १३ वी, सर्व शाखांमधील पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड्स), बी.ई., बी.सी.ए., एम.बी.ए. आणि इतर सर्व पदवीधारक उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहे. जैन फॉर्म फ्रेश फुड्स लि., जैन इरिगेशन सिस्टीम प्रा. लि., द सुप्रीम इंडस्ट्रीज लि., गुजरात अंबुजा, उत्कर्ष स्मॉल बँक, जळगाव जनता सहकारी बँक, खान्देश मोटर्स, छबी इलेक्ट्रिक प्रा. लि. आणि टी.के. प्रोसेसिंग प्रा. लि. अशा अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
नोंदणी कशी कराल?..
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या पोर्टलवर जाऊन संबंधित पदांसाठी अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि बायोडाटासह थेट मेळाव्याच्या दिवशी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्याबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवार कार्यालयीन वेळेत (सकाळी ०९.४५ ते संध्याकाळी ०६.१५) ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधू शकतात, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी दिली.