जळगाव, (प्रतिनिधी) : शहरी लोक बोलीभाषा बोलण्यास संकोच करतात, त्यामुळे ग्रामीण लोकच बोलीभाषेचे खरे तारणहार आहेत, असे प्रतिपादन १८ व्या बहिणाबाई – सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. फुला बागूल यांनी केले. पवन चॅरिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट आणि अन्य संस्थांच्या वतीने आयोजित हे संमेलन जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात १३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
संमेलनाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना ‘बहिणाबाई – सोपानदेव चौधरी- मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. तसेच, त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. खा. स्मिता वाघ यांनी अहिराणी भाषेला पुढे आणण्याची आवश्यकता व्यक्त केली, तर आमदार सुरेश भोळे यांनी शिक्षण कितीही घेतले तरी आपली संस्कृती जोपासणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
संमेलनात ‘आणि ‘ती’ लिहिती झाली…’, ‘कथाकथन’ आणि ‘बालकांचे भावविश्व आणि साहित्य सहवास’ या विषयांवर विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. या सत्रांमध्ये संध्या महाजन, पोर्णिमा मोरे, प्रा. गोपीचंद धनगर, संस्कृती पवनीकर, जयश्री काळवीट, सुधीलकुमार शिंदे आणि माया धुप्पड अशा अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली खान्देशातील अनेक कवी-कवयित्रींनी विविध विषयांवर कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. संमेलनात मराठी भाषेला महत्त्व देणे, नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे, बोलीभाषा विकास संस्था स्थापन करणे आणि साहित्यिक पुरस्कारांची संख्या वाढवणे यांसारखे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विलास नारखेडे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.