पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यात अल्पवयीन मुलाला विवस्त्र करून त्याचे अश्लील व्हिडीओ काढले आणि ते व्हायरल केल्याप्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ९ जुलै रोजी तालुक्यातील एका गावात घडली.
हा अल्पवयीन मुलगा गिरणा नदी काठावर वाळूच्या ट्रॅक्टरवर काम करत होता. त्यावेळी संशयित पंकज पाटील आणि दिला भोई यांचे भांडण सुरू झाले. मुलाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यास पंकज पाटील याने खाली बसवून त्याचे कपडे काढले. त्यास विवस्त्र करीत छेडछाड केली. त्याचे नग्नावस्थेत व्हिडीओ काढून मोबाइलवर व्हायरल केले व त्यास मारहाण केली.
यावेळी त्या अल्पवयीन मुलाने रात्रीच मोटारसायकलवर दादू नावाच्या साथीदारासह घर गाठले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने, पीडित मुलाने पाचोरा पोलिसात फिर्याद दिल्यावरून पंकज पाटील व दिला भोई (दोघे रा. कुरंगी) यांच्याविरुद्ध पॉक्सो व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.