जळगाव, (प्रतिनिधी) : वडिलांनी रागावल्याने सोळा वर्षांच्या प्रज्ञा रवींद्र शिंदे (रा. खेडी हुडको परिसर) या अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ जून) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खेडी हुडको परिसरात राहणारे रवींद्र शिंदे हे सेंट्रिंगचे काम करतात. ते आपली पत्नी, तीन मुली आणि दोन मुलांसह राहतात. त्यांची १६ वर्षांची मुलगी प्रज्ञा बुधवारी (१८ जून) बाहेर गेली होती आणि रात्री आठ वाजता घरी परतली. यावरून तिच्या वडिलांनी तिला जाब विचारला आणि रागावले. वडिलांच्या बोलण्याने चिडलेल्या प्रज्ञाने कोणालाही काहीही न सांगता घरातून पुन्हा निघून गेली. घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या बैठक हॉलजवळील एका विहिरीत तिने उडी घेतली. गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
घटनेची माहिती मिळताच प्रज्ञाचे नातेवाईक आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. काही नागरिकांच्या मदतीने मुलीला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आपल्या मुलीचा मृतदेह पाहताच आई-वडिलांनी मोठा आक्रोश केला.
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.










