जळगाव, दि. 10 – भोकर येथील पशुवैद्यकीय दवाखाना तसेच आरोग्य उपकेंद्र व्हेंटिलेटरवर असल्याची तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. जळगांव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने तातडीने कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करावी, व तसेच ‘लाळ खुरपत’ या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने लसीकरण करावे. अन्यथा यापुढे शेतकऱ्यांचे जनावरे पशुसंवर्धन विभागाच्या हलगर्जीपणा मुळे दगावल्यास, त्या मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची अंत्ययात्रा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आणली जाईल असा इशारा जळगांव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका संघटक सचिव प्रा.भाऊसाहेब सुखदेव सोनवणे यांनी दिला.
तालुक्यातील भोकर गावासह परिसरातील गावांमध्ये काही दिवसांपासून “लाळ खुरपत” रोगाची साथ पसरल्याने शेतकऱ्यांत घबराट आहे. गेल्या एक ते दोन महिन्यांपासून जळगांव तालुक्यातील गावांमध्ये “लाळ खुरपत” रोगाने थैमान घातले असूनही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे झोप लक्ष असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
जळगांव तालुक्यातील भोकर सह परिसरात भादली, कठोरा, किनोद, आमोदा, जामोद, पळसोद, गाढोदा, कानळदा, नांद्रा, नदगाव, पीलखेडा व अन्य गावातील जनावरांमध्ये “लाळ खुरपत” रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
महाराष्ट्र राज्य व जळगांव जिल्हा आरोग्य विभाग यांनी तत्परता दाखवत उपाय योजना करावी. गाय, बैल, म्हैस, शेळ्या,मेंढ्या या जनावरांमध्ये “लाळ खुरपत” रोग प्रामुख्याने आढळतो. या रोगास प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून नियमितपणे लसीकरण मोहीम राबविण्यात येते. पण दोन ते तीन वर्षांपासून पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नाही. पशुसंवर्धन आरोग्य विभागाने या कडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रा.भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, आशा माळी, सोमनाथ माळी, राज पाटील व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.