जळगाव, (प्रतिनिधी) : मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या ९ वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी घोडगाव ता. चोपडा येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे हे होते. या वेळी जिल्ह्यातील २८ शहीद जवानांच्या स्मारकांसाठी शासनाची मान्यता घेवून लवकरच जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर करून भव्य स्मारकं उभारण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.
या भावनिक प्रसंगी हजारो ग्रामस्थ उपस्थित राहिले. ‘जय हिंद’ च्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात शूर जवानाला अभिमानाने मानवंदना देण्यात आली. “सुनील पाटील फक्त शेतकऱ्याचा मुलगा नव्हता, तर तो मातृभूमीचा सच्चा शूरवीर होता. त्याच्या शौर्याचे हे स्मारक पुढच्या पिढ्यांना देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश देत राहील,” असे उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. या वेळी शहीद जवानाच्या पुतळ्याला ‘गौरव सलामी’ देण्यात आली. ही एक सशस्त्र व शिस्तबद्ध सन्मान परंपरा असून, ती विशिष्ट शूरवीर, मान्यवर किंवा शहीद यांच्यासाठी दिली जाते. ४४ वी वाहिनी भारत-तिब्बत सीमा पोलिस बल, बेळगाव (कर्नाटक) येथून आलेल्या पथकाने ही सलामी दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीने शहीद जवानाच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांची मदत माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते ही रक्कम सुपूर्त करण्यात आली. सिंदूर ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानपूर्वक सलाम करण्यात आला.
या प्रसंगी माजी आ. लताताई सोनवणे, शहीद जवान सुनील पाटील यांचे कुटुंबीय – आई मल्लिकाबाई, पत्नी पुनम, मुलगी समृद्धी, आजोबा प्रभाकर, व चुलत भाऊ कैलास पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उद्योगपती प्रकाश बाविस्कर, मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, विकी सनेर, एम. व्ही. पाटील, ऍड शिवराज पाटील यांच्यासह ग्रामस्थ नागरिक विद्यार्थी, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.