जळगाव, (प्रतिनिधी) : शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा येथे दारू पाजली नाही या रागातून एका तरूणासह त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना मंगळवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी ३ एप्रिल रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक रमेश सोनवणे (वय ४५ रा. सावखेडा ता. जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचा मुलगा चेतन सोनवणे याने गावात राहणारे अनिल अशोक सोनवणे आणि सागर राजू सोनवणे यांना दारू पाजली नाही या रागातून चेतन सोनवणे याला गावातील अंगणवाडी येथे मंगळवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अनिल अशोक सोनवणे, सागर राजू सोनवणे, अलकाबाई राजू सोनवणे आणि मोहिनी अमोल सोनवणे सर्व रा. सावखेडा ता.जळगाव यांनी दिपक सोनवणे, मुलगा चेतन सोनवणे, मुलगी विद्या आणि जावई समाधान ज्ञानेश्वर ब्राम्हणे यांना शिवीगाळ व मारहाण करून दुखापत केली.
यात दिपक सोनवणे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मारहाण करणारे अनिल अशोक सोनवणे, सागर राजू सोनवणे, अलकाबाई राजू सोनवणे आणि मोहिनी अमोल सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुर्यकांत नाईक हे करीत आहे.