अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत पाच घरांमधील संसार जळून खाक झाला आहे. या आगीत अंदाजे २६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. सात्री येथील आगीत घरांचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले आहेत.
आगीत गव्हरलाल संतोष बोरसे, रामचंद्र पोपट पाटील, जितेंद्र शालिक पाटील, बाळू पोपट पाटील आणि विश्वास निंबा पाटील यांच्या मालकीची घरे जळून खाक झाली आहेत. लाकूड आणि मातीच्या छताची घरे, संसारोपयोगी वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. घरातील साहित्यदेखील जळून नष्ट झाले असून, अन्नधान्य, शेती अवजारे, मोटारसायकल, ट्युबवेल, पाण्याची टाकी, ठिबक सिंचनासाठी वापरण्यात येणारे बंडल, दोन गॅस सिलिंडर, २०० लिटर तेलाची टाकी आणि २० लिटर डिझेल देखील आगीत खाक झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, सरपंच महेंद्र बोरसे, मंडळाधिकारी योगिता न्हाळदे, ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी परवर तडवी आणि पोलिस पाटील विनोद बोरसे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आग कशामुळे लागली याचा तपास केला जात आहे. आगीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणांकडून त्वरित मदतीचे प्रयत्न सुरू असून, पीडित कुटुंबांना लवकरात लवकर आवश्यक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.








