किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना वरणगाव येथे शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांच्या पार्थिवाला मानवंदना देताना अपघात झाला. पार्थिवाच्या दर्शनासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये मागील बाजूने चढत असताना ट्रकवरील लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला जोरात लागला. यावेळी त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला आणि त्यांना क्षणभर चक्कर आली. घटनेनंतरही मंत्री महाजन थांबले नाहीत. त्यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
मंत्री महाजन यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी आणि शेख आखलाक यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. वरणगावमधील डॉ. निलेश पाटील यांनी मंत्री महाजन यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
यानंतर महाजन यांनी शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नी व कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. “देशसेवेतील कर्तव्य बजावत अर्जुनला वीरमरण आले आहे, त्याचे दुःख आम्हालाही आहे. मी आणि राज्य सरकार त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर, ते थेट अंत्ययात्रेत सहभागी झाले. हजारो वरणगावकरांच्या उपस्थितीत तिरंगा सर्कल येथे शहिद जवानास मानवंदना दिली. दरम्यान डॉक्टरांनी मंत्री महाजन यांना पुढील उपचारांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, मात्र महत्त्वाची बैठक असल्याने ते तातडीने नाशिकला रवाना झाले.