जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव शहरातील एका कम्प्युटर सेंटरमध्ये पिशवीत ठेवलेल्या पाच लाख रुपयांच्या रोकडमधुन सुमारे दोन लाखाची रोकड सफाईने काढुन संशयितांनी पोबारा केला. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित महिला कैद झाल्या आहेत.
धरणगाव येथील बालाजी कम्प्युटर सुविधा सेंटरमध्ये हा प्रकार गुरुवारी २० मार्च रोजी सकाळी ११.०२ वाजेच्या सुमारास घडला. सुविधा केंद्राच्या टेबलाजवळ पिशवीत पाच लाखाची रोकड होती. या केंद्रात दोन महिला आल्या. संबधित कामाच्या बाबत त्यांनी विचारपूस करत पिशवीतून दोन लाखाची रोकड नेली.
माहिती कळताच पोलीस निरीक्षक पवन देसले, सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी धाव घेतली. प्रकार जाणून घेतला. भुषण पाटील (वय ३५, रा. धरणगाव) यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्याच्या तपासाला गती दिली आहे. हवालदार चंदुलाल सोनवणे हे तपास करीत आहेत.