जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानसवाडा-शेळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांच्या खूनप्रकरणी भरत भास्कर पाटील या तिसऱ्या संशयितास नशिराबाद पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन अटक केली.
युवराज कोळी यांचा २१ मार्च रोजी सकाळी खून करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये भरत पाटील, त्यांची दोन्ही मुले देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील आणि परेश उर्फ सोनू भरत पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील फरार दोघेही भावंडांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना दि. २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
दरम्यान घटनेतील तिसरा संशयित आरोपी आणि फरार असलेला पिता भरत पाटील याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने शिताफीने अटक केली आहे. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सपोनि ए. सी. मनोरे, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ. शरद भालेराव, शिवदास चौधरी, पोकॉ सागर बिडे यांनी ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही पूर्ण केली आहे.