जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील सम्राट कॉलनी परिसरात उभ्या ट्रकच्या टाकीतून डिझेल चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी यावलमधून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाहनांमधील डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी दि. १६ मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. त्यामध्ये ९,२०० रुपये किंमतीचे १०० लिटर डिझेल भरून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सैय्यद एजाज अकबर ट्रकजवळ गेला असता, टाकीतील संपूर्ण डिझेल गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. डिझेल चोरी झाल्याची खात्री पटताच तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान, गेल्या काही महिन्यांत परिसरात अशा अनेक चोरीच्या घटना घडल्याचे उघड झाले. मात्र, किरकोळ नुकसान झाल्याने बहुतांश वाहनचालकांनी पोलीस तक्रार दिली नव्हती. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका संशयित व्यक्तीला मोटारसायकलवरून येऊन नळीच्या सहाय्याने ट्रकच्या टाकीतील डिझेल चोरताना दिसून आला.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी हा यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील सचिन दगडू ठाकूर (वय, २५) असल्याचे समजले. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्या हालचालींवर नजर ठेवली व त्याला राहत्या घरातून अटक केली. चौकशीत त्याने डिझेल चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १०० लिटर डीझेल जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ गणेश शिरसाळे, योगेश बारी, छगन तायडे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील यांनी केली आहे.