पाचोरा, (प्रतिनिधी) : येथील ज्वेलर्स दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात पाचोरा पोलीसांना यश आले आहे. एक कुख्यात गुन्हेगार अटक झाला असून गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. आणखी २ फरार संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील राहूल विश्वनाथ चव्हाण यांचे मालकीच्या पाटील ज्वेलर्स दुकानाचे चॅनल गेट तोडून दि.०२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीचे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-याची तोडफोड करुन तेथील डीव्हीआर व दुकानातील ६८ हजार रुपयांचे सोन्या च चांदीचे दागीने घरफोडी करुन चोरुन नेले होते. त्याबाबत राहूल विश्वनाथ चव्हाण यांचे फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक कवीता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेरुळे, यांचे मागदर्शनाखाली सुरु असतांना पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी विविध टिम तयार करुन पाचोरा पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
घटनास्थळी फिंगर प्रिंट तज्ञ, डॉगस्कॉडला पाचारण करुन आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक सफेद रंगाची बोलेरोतुन आरोपींनी येवुन गुन्हा करुन फरार झाल्याचे दिसुन येत होते. याबाबत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज प्रसारीत करुन गुन्हयाची माहिती देवून अज्ञात आरोपीतांचा शोध घेत होते. दरम्यान, दि.०२ फेब्रुवारी रोजी धरणगाव पोलीस ठाणे हददीतुन एक बोलेरो वाहन चोरी झाल्याने धरणगाव पोलीस देखील अज्ञात आरोपीतांच्या मागावर असतांना दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीसांना त्यांचे हददीमध्ये अज्ञात आरोपी गुन्हयातील चोरलेले वाहन सोडून पळतांना सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाल्याचे दिसुन आले.
त्या वर्णनावरुन तपास करीत असताना त्यातील संशयित आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी (रा.राजीव गांधी नगर, जळगाव) हा असल्याची पक्की खात्री झाल्याने रामानंद नगर पोलीसांनी दि. ८ फेब्रुवारी रोजी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी यास सापळा रचुन त्यास राजीव गांधी नगर जळगाव येथुन ताब्यात घेतले.
धरणगाव पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हा मध्ये सदरचे आरोपीतास अटक करण्यात येवुन गुन्हयातील बोलेरो कार क्रमांक (एमएच-१९-ए एक्स-७०९८) जप्त करण्यात आली होती. सदर संशयित आरोपीताने दि.४ रोजी खामगाव बुलढाणा येथे एटीएम फोडुन ते सदर बोलेरो मध्ये घेवुन जाण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. म्हणुन सदर गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता शिवाजी नगर पोलीस स्टेशन, खामगाव प्रमाणे दाखल असल्याचे मिळुन आले.
याबाबत पाचोरा पोलीसांनी तात्काळ धरणगाव येथे जावुन तेथील अटकेतील आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी रा. राजीव गांधी नगर, जळगाव यास पाचोरा पोलीस ठाणे कडील गुन्हयात वर्ग करण्यात येवुन आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली. प्रथमतः आरोपीताने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत सखोल चौकशी करता अटक संशयित आरोपीने गुन्हयाची कबुली देवुन सदरचा गुन्हा त्याचे संशयित साथीदार सख्खा भाऊ हघुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जिवनसिंग जुन्नी (रा.राजीवगांधी नगर, जळगाव), सुवेरसिंग राजुसिंग टाक (रा. मानवत, परभणी) शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा.बोंड, परभणी) यांचे मदतीने केल्याचे व गुन्हयातील मुददेमाल जळगाव येथील सोनाराकडे गहाण ठेवले बाबत कबुली दिली.
पोलीसांनी तात्काळ जळगाव येथे जावुन अटकेतील आरोपी रणजितसिंग जुन्नी याचे समक्ष घरफोडी चोरीतील सोने चांदीचे वस्तु विकलेल्या सोनाराचे दुकान दाखवुन त्याचेकडुन गुन्हयातील गेला माल सोन्याचांदीची लगड एकुण कि.रु. ६७ हजार ८१ रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलीसांना यश आलेले आहे. अटक आरोपी हा अटटल गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द जळगाव, बुलडाणा येथे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे. यात मलकापुर पोलीस स्टेशन येथे २, रामानंद नगर पोलीस स्टेशन, जळगाव येथे ७, जिल्हापेठ पोलीस स्टेशन १, शनिपेठ पोलीस स्टेशन १, एरंडोल पोलीस स्टेशन १, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, खामगाव असे १३ गुन्हे उघडकीस आले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मागदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे, पोहवा/राहूल शिंपी, सहा. पोलीस उप निरीक्षक रणजित पाटील, पोकॉ योगेश पाटील, सागर पाटील, मजिदखान पठाण यांचे पथकाने केली आहे. अटक आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन अटक आरोपीताने त्याचे साथीदारांचे मदतीने अशाच प्रकारचे गुन्हे यापूर्वी केल्याची शक्यता असुन त्यादृष्टीने पाचोरा पोलीस पुढील तपास करीत असुन घरफोडीचा गुन्हा उघउकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.